शिक्षण विभागाचा अभिनव उपक्रम- एक पेड माँ के नाम
मुलांमध्ये पर्यावरणप्रेमाची बीजे रोवणारा स्तुत्य उपक्रम 2 लाख 59 हजार विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

नांदेड, 2- राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या संकल्पनेतून चालू शैक्षणिक वर्षात एक पेड माँ के नाम हा आगळा-वेगळा उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील तब्बल 2 लाख 59 हजार 280 विद्यार्थी आपल्या आईच्या नावाने झाडे लावणार आहेत. यामुळे वृक्षसंवर्धनासाठी विद्यार्थ्यांचा भावनिक सहभाग वाढवला जाणार आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ वृक्षलागवडीपुरता मर्यादित नसून, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी प्रेम, आदर व जबाबदारीची भावना निर्माण करणे हा त्यामागचा हेतू आहे. आई व धरती या दोन्ही मातांचा सन्मान व त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्याचा सर्जनशील मार्ग म्हणून वृक्षारोपण या माध्यमातून निवडण्यात आले आहे.
वनविभागाची साथ
या मोहिमेसाठी वड, पिंपळ, कडुनिंब, बॉम्बे पिंक, अर्जुन यांसारख्या स्थानिक व उपयुक्त वृक्षांची लागवड केली जाणार आहे. वन विभाग व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या सहकार्याने आवश्यक झाडांची उपलब्धता सुनिश्चित केली जाणार आहे.
5 जून ते 30 ऑगस्ट दरम्यान लागवडीचे नियोजन
या उपक्रमाची औपचारिक सुरुवात 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. त्यानंतर 30 ऑगस्टपर्यंत वृक्षलागवडीचा टप्पा पूर्ण करावयाचा आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या आवाहनानुसार सर्व शाळांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
3 हजार 704 शाळांचा सहभाग
जिल्ह्यातील सर्व 3 हजार 704 शाळांमधून सुमारे अडीच लाख विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. शिक्षण विभागाने या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सखोल नियोजन केले आहे.



