गोळीबार करण्याच्या तयारीत असलेला आरोपी नांदेड ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत जखमी; १.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड, दि. ४ जून २०२५ – नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने आत्मरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात एक फरार आणि धोकादायक गुन्हेगार जखमी झाला आहे. पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या आरोपीकडून १.०५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही धाडसी कारवाई मा. श्री. अबिनाश कुमार (पोलीस अधीक्षक, नांदेड), मा. श्री. सुरज गुरव (अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड), मा. श्री. खंडेराव धरणे (अप्पर पोलीस अधीक्षक, भोकर) व मा. श्री. सुशीलकुमार नायक (उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
आरोपीचे नाव: प्रभाकर शंकरराव हंबर्डे, रा. विष्णुपुरी, ता. व जि. नांदेड
जप्त मुद्देमाल: गावठी कट्टा – अंदाजे किंमत ₹२५,०००/- पल्सर दुचाकी (MH-26-BK-4386) – किंमत ₹८०,०००/- एकूण किंमत: ₹१,०५,०००/-
“ऑपरेशन फ्लश आउट” अंतर्गत जिल्ह्यातील फरार आरोपींना अटक करण्याच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक श्री. ओमकांत चिंचोलकर यांना माहिती मिळाली की, पो.स्टे. नांदेड ग्रामीण गु.र.नं. ४९२/२०२५ कलम १०९ (भारतीय न्याय संहिता – २०२३) मधील फरार आरोपी प्रभाकर हंबर्डे विष्णुपुरी परिसरात अवैध गावठी कट्टा बाळगून फिरत आहे.
त्यावरून पोलीस पथकाने सापळा रचून आरोपीचा पांगरी रोडवर पाठलाग केला. पोलिसांना पाहून आरोपीने त्याच्या जवळील गावठी पिस्टलने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पो.नि. ओमकांत चिंचोलकर यांनी आत्मसुरक्षेच्या उद्देशाने आरोपीच्या पायाच्या खालील भागावर गोळीबार केला. गोळी लागून आरोपी जखमी झाला व खाली पडला. त्याच्या हातातील गावठी कट्टा ताब्यात घेण्यात आला आहे.
जखमी आरोपीस शासकीय रुग्णालय, विष्णुपुरी येथे दाखल करण्यात आले असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. कांबळे यांनी पंचनामा व फॉरेन्सिक तपासासाठी पुढील कार्यवाही केली.
पोलिसांचे आवाहन: पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही व्यक्तीने अवैध हत्यार किंवा आग्नेयास्त्र बाळगू नये, किंवा सोशल मीडियावर अशा गोष्टींचा प्रचार करून दहशत निर्माण करू नये. असे आढळल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
वरील धाडसी कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी व अमंलदारांची मा. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी प्रशंसा केली आहे.
संपर्कासाठी: पोलीस स्टेशन, नांदेड ग्रामीण – जिल्हा पोलीस कार्यालय, नांदेड.



