“विश्वास ठेवला आजीने, घात केला नातवाने” – हिमायतनगरमध्ये खून प्रकरणाचा उलगडा, आरोपी नातू अटकेत

हिमायतनगर | 10 जून 2025 – “विश्वास ठेवला आजीने, पण घात केला नातवाने” अशी म्हण सिद्ध ठरली आहे. हिमायतनगर पोलिसांनी स्थागुशा पथकाच्या सहकार्याने 75 वर्षीय वयोवृद्ध महिलेच्या खूनप्रकरणी तिच्या नातवाला अटक केली असून, त्याच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
दिनांक 5 जून 2025 रोजी टेंभुर्णी (ता. हिमायतनगर) येथे गयाबाई रामजी तवर उर्फ देवसरकर (वय 75) यांचा खून झाला होता. फिर्यादी किसनराव वानखेडे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात इसमाने गयाबाई यांचे सोन्याचे दागिने व ₹90,000 रोख असा एकूण ₹2,74,000 चा ऐवज जबरदस्तीने घेऊन त्यांचा खून केला.
घटनेच्या गांभीर्यामुळे पोलीस अधीक्षक श्री. अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तांत्रिक तपासात गयाबाई यांची नात शांताबाई वानखेडे हिचा मुलगा मारोती उर्फ बाळू वानखेडे (वय 35, रा. दिघी) याच्यावर संशय बळावला.
तपासात निष्पन्न झाले की, बाळू याने घरबांधणीसाठी घेतलेल्या कर्जाचे फेड न झाल्यामुळे आर्थिक तंगीमुळे हा घातपात केला. 3 जूनच्या रात्री त्याने आजीच्या घरात प्रवेश करून त्यांच्या अंगावरील व पेटीत ठेवलेले दागिने आणि रोकड चोरून नेण्याचा प्रयत्न केला. आजीने प्रतिकार केला असता त्याने तिला लाकडी बाजेवर फेकले, तोंडात कापड कोंबले आणि नाकावर हात दाबून खून केला.
पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून ₹58,400 किमतीचे दागिने जप्त केले असून, उर्वरित ऐवजाचा शोध सुरू आहे. आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या तपासामध्ये पोलीस निरीक्षक अमोल भगत (हिमायतनगर), सपोनि नोमदेव मद्दे, पो.उ.नि. साईनाथ पुयड (स्थागुशा), तसेच सायबर सेलच्या अधिकाऱ्यांचा मोलाचा वाटा होता. पोलिस अधीक्षक श्री. अभिनाश कुमार यांनी या उत्कृष्ट तपासासाठी सर्व पथकाचे अभिनंदन केले आहे.



