आंतर जिल्हा मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश – स्थानिक गुन्हे शाखा नांदेडची यशस्वी कारवाई

नांदेड, 21 जून 2025: नांदेड जिल्ह्यातील विविध भागांत मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार राबवण्यात आलेल्या ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कामगिरी बजावत आंतर जिल्हा मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
अटक आरोपींची नावे: ज्ञानेश्वर बालाजी लोखंडे, वय 26 वर्षे, रा. पिंपळा लोखंडे, ता. पूर्णा, जि. परभणी, बालाजी काशिनाथ पवार, वय 25 वर्षे, रा. आव्हई, ता. पूर्णा, जि. परभणी, बालाजी शंकरराव राजेगोरे, वय 20 वर्षे, रा. शेलगाव, ता. अर्धापूर, जि. नांदेड दोन विधीसंघर्ष बालक
जप्त मुद्देमाल: वेगवेगळ्या कंपन्यांच्या एकूण 06 मोटारसायकली
एकूण किंमत: ₹2,75,781/-
दिनांक 21 जून 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की निळारोडवरील सम्राट बार येथे काही युवक चोरीच्या मोटारसायकलींसह आल्याचे निदर्शनास आले. यानंतर सपोनि श्री. रवी वाहुळे, पोउपनि आनंद बिचेवार व त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत तीन आरोपी व दोन बालकांना ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींनी पोलीस स्टेशन उस्माननगर (नांदेड), कुरुंदा, वसमत ग्रामीण व वसमत शहर (हिंगोली) येथून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून 06 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून पुढील कारवाईसाठी त्यांना उस्माननगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाईत सहभागी सर्व अधिकाऱ्यांचे व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक मा. अबिनाश कुमार यांनी विशेष कौतुक केले असून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अशा तत्परतेने सुरू ठेवलेल्या कारवाया नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहेत.



