जिला

जिल्ह्यातील सर्व गाव स्वच्छ सर्वेक्षण 2025 साठी सज्ज

ग्रामस्थ, कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग SSG 2025 अ‍ॅपद्वारे नागरिकांचे योगदान महत्त्वाचे

नांदेड, 26- स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा- 2 अंतर्गत होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण 2025 साठी नांदेड जिल्ह्यातील सर्व गावांनी सज्जतेची कास धरली आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, तालुका व गट समन्वयक, समूह समन्वयक यांच्या सक्रिय सहभागाने गावोगावी स्वच्छतेविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
      या सर्वेक्षणादरम्यान ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, धार्मिक स्थळे, बाजारपेठा अशा विविध ठिकाणी केंद्रीय समिती सदस्य प्रत्यक्ष पाहणी करणार असून, गृहभेटीद्वारे ग्रामस्थांकडून स्वच्छतेविषयी माहिती गोळा केली जाणार आहे.
      गावामध्ये दृश्यमान स्वच्छता, सार्वजनिक शौचालये, शाळा व अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृहे, हात धुण्याची सुविधा, कचराकुंड्या, प्लास्टिक निर्मूलन,  कचरा वर्गीकरणासाठी सेग्रीगेशन शेड यासारख्या बाबींसाठी आवश्यक पूर्वतयारीचे निर्देश दिले गेले आहेत.
      जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कवली, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक नारायण मिसाळ, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, महिला व बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशांत थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे,  ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांनी सर्व ग्रामपंचायतींमध्ये बैठका घेऊन सर्वेक्षणाच्या पूर्वतयारीची माहिती दिली आहे. याविषयी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील तज्ञ व सल्लागार दौरे करून स्वच्छ सर्वेक्षण 2025 ची ग्रामस्थांना माहिती देत आहेत.
      स्वच्छ सर्वेक्षणाचे एकूण गुणांकन 1000 गुणांमध्ये होणार असून त्यामध्ये- घनकचरा व्यवस्थापनसाठी 120 गुण, ग्रामस्थांचा सहभाग 100 गुण, स्वच्छता सुविधा व वापर 240 गुण, प्रत्यक्ष निरीक्षण व प्रश्नावली 540 गुण असे एकूण 1000 गुणांमध्ये मूल्यांकन केले जाणार आहे.
      या सर्वेक्षणात नागरिकांची थेट सहभाग देखील अपेक्षित आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने प्ले स्टोअरवरून SSG 2025 हे अधिकृत अ‍ॅप डाऊनलोड करून गावातील स्वच्छतेविषयी माहिती भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
         ग्रामपंचायतींना स्वच्छता संबंधित सर्व नोंदी, ग्राम पाणीपुरवठा समिती यादी, बैठकांचे नोंदवही, शौचालय नोंदवही, तसेच स्वच्छता जनजागृतीसाठी रंगवलेली भिंती, स्लोगन, म्हणी यांची माहिती समितीसमोर सादर करण्यास तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आपले गाव – आपली जबाबदारी
-सीईओ मेघना कवली
गावात कायमस्वरूपी स्वच्छता टिकून राहावी यासाठी लोकसहभागातून आपण अनेक ठिकाणी शौचालय सुविधा, दृश्यमान स्वच्छता व स्वच्छता जनजागृती यासारखी कामे केली आहेत.
         आता केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2025 या महत्वाच्या तपासणीत आपले गाव उत्कृष्ट सादर करणे ही प्रत्येक ग्रामस्थाची जबाबदारी आहे. सर्व ग्रामस्थांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कवली यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *