कै. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेडकरांसाठी नव्या रूपात सज्ज – नूतनीकरणानंतर पुन्हा खुले होणार

नांदेड – नांदेड शहरातील सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेले कै. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह आता पूर्णपणे नूतनीकरण होऊन नांदेडकरांसाठी नव्या रूपात सज्ज झाले असून लवकरच सार्वजनिक वापरासाठी खुले होणार आहे. ३० कोटी रुपयांच्या खर्चाने हे नूतनीकरण करण्यात आले आहे.
गुरु गोविंद सिंग स्टेडियमच्या शेजारील जागेवर नगरपालिकेच्या काळात, कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या हयातीतच या प्रेक्षागृहाच्या उभारणीस सुरुवात झाली होती. नाट्य, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांना चालना देणारे हे सभागृह काही काळ उपेक्षित व निष्क्रिय झाले होते. मात्र, महापालिकेने याकडे लक्ष देत आता संपूर्ण सभागृहाचे बाह्य आणि अंतर्गत रूप पालटले आहे.
नवे वैशिष्ट्ये:
संपूर्ण वातानुकूलित प्रेक्षागृह
आधुनिक ध्वनी यंत्रणा व प्रकाशयोजना
नेटके, सुसज्ज अंतर्गत सजावट
नाटक, संगीत, शैक्षणिक कार्यक्रमांसाठी आवश्यक सर्व सुविधा आता सभागृहातच उपलब्ध
बाह्य भागात आकर्षक डिझाईन आणि रस्ते व्यवस्था
प्रेक्षकांसाठी गोकुळनगर बाजूने नवीन प्रवेशद्वार
वाहन पार्किंगसाठी प्रशस्त जागा
पूर्वी ध्वनी व प्रकाशासाठी संयोजकांना बाहेरून साहित्य भाड्याने घ्यावे लागत होते, मात्र आता या सर्व सुविधा प्रेक्षागृहातच उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शालेय कार्यक्रम, नाट्य सादरीकरण, सांगीतिक मैफिली यांचे आयोजन अधिक सोयीचे व खर्चिकही कमी होणार आहे.
या नव्याने सजलेल्या प्रेक्षागृहामुळे नांदेडचे सांस्कृतिक वैभव अधिक बहरणार असून, स्थानिक कलाकार, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, आणि सामाजिक संस्था यांना याचा मोठा फायदा होणार आहे. नांदेड महापालिकेचा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य ठरणार आहे.



