अहिल्यानगर हादरलं! पोलिस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा;
लग्नाचं आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध

अहिल्यानगर : नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर गुन्हा दाखल झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
तोफखाना पोलिस ठाण्यात हा गुन्हा शून्य क्रमांकाने नोंदवून पुढील कार्यवाहीसाठी पालघर जिल्ह्यातील मनोरा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेने आपल्या तक्रारीत धक्कादायक आरोप करत म्हटले आहे की, सन 2023 ते 2024 या काळात दराडे यांनी तिला लग्नाचं आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या काळात मनोरा (पालघर) येथील एका फार्महाऊसवर तसेच मुंबईतील जोगेश्वरी (पश्चिम) येथे वारंवार अत्याचार झाले. सुरुवातीला लग्नाचं आश्वासन देण्यात आलं, मात्र नंतर त्यांनी लग्नास नकार दिला. एवढंच नाही तर पीडितेवर शिवीगाळ करून तिला जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या.
या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. या धक्कादायक घटनेमुळे अहिल्यानगरसह संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याने कार्य करणाऱ्या पोलिस दलातीलच वरिष्ठ अधिकाऱ्यावर बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने पोलिस यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
नागरिकांत संतापाचं वातावरण असून, “सामान्य जनतेचं रक्षण करण्याची शपथ घेणाऱ्या अधिकाऱ्यांवरच गुन्हे नोंदवले जात असल्याने पोलिस दलाची प्रतिमा धोक्यात येते” अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.



