शास्त्रीनगर गृहनिर्माण संस्थेतील भूखंड प्रकरणी पुन्हा एकदा उपोषण

किनवट / नांदेड – शास्त्रीनगर गृहनिर्माण सहकारी संस्थेतील (नोंदणी क्र. रन.एन. एन. डी./बी.एच.आर /एच. एस.जी. २७४-८१) भूखंडधारक युसुफ खान नजरअली खान यांनी आपल्या भूखंडाचा ताबा मिळवण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय नांदेडसमोर बुधवार, 8 ऑक्टोबर 2025 पासून साखळी उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. संस्थेच्या तत्कालीन चेअरमनने गेल्या 40 वर्षांपासून ले-आउट मंजूर करून घेतला नसल्याचा त्यांचा आरोप आहे, ज्यामुळे भूखंडांचे अधिकृत नियोजन झालेले नाही.
या प्रकरणी त्यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला अनेक निवेदने दिली आहेत.
संदर्भ क्र. 1 ते 7 नुसार, त्यांनी आपली मागणी शासनासमोर मांडली आहे. जिल्हा उपनिबंधक (नांदेड) आणि जिल्हाधिकारी (नांदेड) यांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले असतानाही, सहायक निबंधक सहकारी संस्था, किनवट यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप युसुफ खान यांनी केला आहे. यामुळे संस्थेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. परंतु प्रशासकांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही, त्यामुळे त्यांना भूखंडाचा ताबा मिळालेला नाही. या स्थितीमुळे संतप्त होऊन युसुफ खान यांनी उपोषणाचा मार्ग निवडला आहे.
युसुफ खान यांच्या प्रमुख मागण्या:
संस्थेवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत कलम 154 (ब) 23 (1) आणि कलम 35 नुसार कार्यवाही करून त्यांना भूखंड मिळवून देणे आणि सभासदत्व बहाल करणे.
संस्थेच्या चेअरमनवर कठोर कार्यवाही करून मूळ 30 सभासदांना भूखंड वाटप करणे.
सभासद यादीतून चार वर्षांच्या मुलाचे नाव वगळून कार्यवाही करणे.
जुने ऑडिट तपासणी करून नव्याने समाविष्ट झालेली नावे वगळणे.
त्यांनी सूचक असलेल्या ठरावानुसार वाढवलेले सर्व सभासद रद्द करणे.
जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. उपोषणादरम्यान उद्भवणाऱ्या शारीरिक, आर्थिक आणि मानसिक त्रासाला सर्वस्वी शासन जबाबदार असेल, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.



