आज सकाळी 8 ते 9 जिल्ह्यात महाश्रमदान : ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन

नांदेड, 24- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचा भाग म्हणून जिल्ह्यात आज गुरुवार दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 9 या वेळेत महाश्रमदान – एक दिवस, एक तास, एक साथ हा विशेष उपक्रम राबविला जाणार आहे.
या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून गावातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, शाळा, मंदिर, बाजारपेठा, ग्रामपंचायत आवार तसेच पर्यटनस्थळे व धार्मिक स्थळांची स्वच्छता करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले आहे.
महाश्रमदान उपक्रम यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, पत्रकार, महिला बचत गट व समाजसेवक यांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केले आहे
स्वच्छता ही सेवा पंधरवडा अंतर्गत दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान दररोज वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या कालावधीत आज 25 सप्टेंबर रोजी महाश्रमदान, 26 सप्टेंबर रोजी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निर्मित प्रकल्पांचे उद्घाटन, 27 सप्टेंबर रोजी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन परिसराची साफसफाई तसेच ग्रामपंचायत स्वच्छ वार्ड स्पर्धा, 28 सप्टेंबर रोजी सफाई मित्र सुरक्षा शिबिर व एक खिडकी योजनेव्दारे पात्र लाभार्थ्यांसाठी मोहीम, 29 सप्टेंबर रोजी एक दिवस, एक तास या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छता विषयावर धडे, 30 सप्टेंबर रोजी स्वच्छतेची वाहने व उपकरणे यांची स्वच्छता व नुतनीकरण, 1 ऑक्टोबर रोजी स्वच्छता प्रतिज्ञा व 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छता दिवस साजरा करून ग्रामसभा तसेच अभियानाचा समारोप करण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांचे गाव पातळीवर यशस्वी आयोजन करण्यासाठी गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी योग्य ती नियोजनबद्ध अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.



