धनगर समाजाचे त्रिधार येथे रस्ता रोको आंदोलन

परभणी धनगर समाजाला एस.टी. (अनुसूचित जमाती) प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज दि. 1 ऑक्टोबर रोजी परभणीतील त्रिधार पाटी येथे धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात समाजातील शेकडो बांधव मेंढ्यांसह सहभागी झाले होते
धनगर समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने होत आहे. मात्र शासनाने अद्याप याबाबत ठोस निर्णय न घेतल्याने समाजामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे तातडीने धनगर समाजाला एस.टी. (S.T.) प्रवर्गातून आरक्षण मंजूर करण्याची मागणी केली. या मागणीसाठी समाजाचे नेते दीपक बोराडे हे गेल्या 13 दिवसांपासून जालना येथे उपोषण करत आहेत. शासनाने उपोषणाची आणि समाजाच्या आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा लढा आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
यावेळी मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते. आंदोलनादरम्यान रस्त्यावर मेंढ्या सोबत आणल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. प्रशासन चे कर्मचाऱ्याला निवेदन देऊन शासनाने आरक्षणाच्या मागणीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.



