मराठवाडा

जिल्हाधिकारी-सीईओंचा हदगाव-माहूरचा संयुक्त दौरा

शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत व विकासकामांची पाहणी; दुष्काळी उपाययोजनांचा आढावा

 

 

 

नांदेड, ७ – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी मंगळवार दिनांक ७ ऑक्‍टोबर रोजी हदगाव व माहूर तालुक्याचा संयुक्त दौरा करून शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, आरोग्य तपासणी शिबिर तसेच विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

हदगाव तालुक्यातील पळसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आकस्मिक भेट दिली असता, रजेचा अर्ज उपलब्ध नसताना तीन शिक्षक गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. शाळा परिसर व वर्गखोल्यांमध्ये तसेच अंगणवाडी परिसरात नियमित स्वच्छता ठेवण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेतला. पालक व ग्रामस्थांशी चर्चा केली. पळसा येथील अंगणवाडीच्या पाहणीत बालकांचे वेळेत वजन घेणे, बालकांना सकस आहार देण्याच्या सूचना केल्या.

माहूर तालुक्यातील मालवाडा येथे पीक कापणी प्रयोगाची पाहणी करून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतीविषयक अडचणी जाणून घेत विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी नरेगा अंतर्गत जलतारा कामाचा शुभारंभ करण्यात आला. पाणी संवर्धन व जलसाठा वाढविण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन करण्यात आले.

लखमापूर येथे आरोग्य तपासणी कॅम्पला भेट देऊन नागरिकांना उपलब्ध आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात आला. नियमित आरोग्य तपासणी तसेच हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक आहार व आरोग्यविषयक काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. लखमापूर ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधताना दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी संवर्धन, जलसंधारण व नरेगा अंतर्गत रोजगारनिर्मितीच्या कामांचा आढावा घेण्यात आला. लखमापूर येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच पालकांशी चर्चा करण्यात आली.

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेणुका माता देवस्थान येथेही आढावा घेण्यात आला. भाविकांची सुरक्षितता, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था व आवश्यक सुविधांबाबत संबंधित यंत्रणांकडून करण्यात आलेल्या तयारीची पाहणी करून आवश्यक सूचना देण्यात आल्या.

यानंतर माहूर पंचायत समिती सभागृहात तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. नरेगा अंतर्गत रोजगारनिर्मिती, जलसंधारण, पाणी संवर्धन, शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेचा लाभ तसेच दुष्काळी उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या कर्जविषयक अडचणी, बँकांशी संबंधित प्रश्न आणि बचत गटांच्या विविध बाबींवरही चर्चा करण्यात आली.

दुष्काळी परिस्थितीत जलसंधारण, रोजगारनिर्मिती आणि शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य यांना प्राधान्य देऊन संबंधित विभागांनी समन्वयाने व प्रभावीपणे काम करावे. तसेच पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत मिळवून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी दिले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *