स्वच्छता ही सेवा अभियानाचा समारोप
जिल्ह्यात आज स्वच्छता दिवस साजरा होणार; स्वच्छतेची शपथ व जनजागृती कार्यक्रम

नांदेड,1- केंद्र व राज्य शासनाच्या वतीने दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत स्वच्छता ही सेवा हे अभियान जिल्ह्यात उत्साहात राबविण्यात आले. या अभियानाला ग्रामपातळीवर चांगला प्रतिसाद मिळाला असून गावोगावी स्वच्छता उपक्रम, श्रमदान, सफाईमित्र आरोग्य शिबिरे तसेच जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले.
आज दिनांक 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त जिल्ह्यात स्वच्छता दिवस साजरा करून या अभियानाचा समारोप करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा घेऊन नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात येईल. तसेच पाणी व स्वच्छतेविषयक जनजागृतीवर भर दिला जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाडी, महाविद्यालये, स्थानिक कार्यालये तसेच ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेची शपथ देऊन स्वच्छता दिवस साजरा करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमित राठोड व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी यांनी केले आहे.



