मराठवाडा

लोकशाही पद्धतीने लढा, टोकाचे पाऊल उचलू नका …! आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

परभणीतील गंगाखेड रूग्णालयात घेतली बंडगर यांची भेट : धनगर बांधवांसोबत कायम असल्याची ग्वाही

 

 

परभणी/गंगाखेड धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या प्रत्येकाचा जीव समाजासाठी अत्यंत महत्वाचा आहे. समाजाला आपली ताकद, धैर्य आणि नेतृत्वाची गरज आहे. मागण्या मांडत राहा, शासनापर्यंत आवाज पोहोचवत राहा, पण जीवावर उदार होऊन आत्महत्येचा मार्ग अवलंबू नका. आपला जीव हा समाजासाठी लाखमोलाचा आहे. म्हणून लोकशाही मार्गाने एकजुटीने लढा पुढे नेऊया आणि आपल्या भावी पिढ्यांना न्याय मिळवून देऊया, असे भावनिक आवाहन स्थानिक आमदार आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी धनगर समाज बांधवांना केले.

उपजिल्हा रुग्णालय, गंगाखेड येथे सामाजिक कार्यकर्ते सुरेश दादा बंडगर यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर आ. डॉ. गुट्टे यांनी समाजाला संयम आणि लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले. धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावे यासाठी जालना येथे दीपक बोऱ्हाडे व सहकारी आमरण उपोषण करत आहेत. या उपोषणाला समर्थनार्थ बंडगर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिस व नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

या पार्श्वभूमीवर आ. गुट्टे यांनी रुग्णालयात भेट देऊन बंडगर यांच्याशी आपुलकीने संवाद साधला. ते म्हणाले की, “धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार करून ठाम भूमिका घेतली आहे. या प्रश्नावर मी आत्तापर्यंत पाठिंबा दिला आहे आणि पुढेही देत राहीन. कारण समाजाच्या मागण्या भावनिक नाहीत, तर ऐतिहासिक व सामाजिक न्यायाशी निगडित आहेत.”

पुढे त्यांनी स्पष्ट केले की, धनगर समाजाच्या मागण्या रास्त आहेत, पण त्यासाठी आत्महत्येचा मार्ग योग्य नाही. “इतिहास साक्षी आहे की लोकशाही मार्गाने झालेली प्रत्येक लढाई यशस्वी ठरली आहे. त्यामुळे आपल्या भावना जपत, संयम राखून, लोकशाही मार्गाने आपण आपल्या हक्कांसाठी लढा दिला पाहिजे,” असे ते म्हणाले.
या प्रसंगी गुट्टे काका मित्र मंडळाचे पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, बंडगर कुटुंबीय तसेच मोठ्या संख्येने धनगर बांधव उपस्थित होते.

…तर तातडीने योग्य उपचार करा!
सामाजिक कार्यकर्ते सुरेश दादा बंडगर हे धनगर समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने लढणारे प्रामाणिक नेते आहेत. यापूर्वीही त्यांनी मौजे चौंडी (अहिल्यानगर) येथे तब्बल २१ दिवस आमरण उपोषण करून आरक्षणाची लढाई बळकट केली होती. समाजासाठी निस्वार्थीपणे झटणाऱ्या अशा कार्यकर्त्याचा जीव सुरक्षित राहावा, यासाठी आ. डॉ. गुट्टे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीने योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या भेटीमुळे बंडगर यांच्या कुटुंबीय व समर्थकांना दिलासा मिळाला.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *