परभणीतील अल्पवयीन मुलीवरील अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ सेलू शहरात उद्या मूक मोर्चा निघणार

दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर घडलेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी तसेच आरोपींना कठोर शिक्षा मिळावी आणि अशा नीच प्रवृत्तीच्या व्यक्तींना धडा मिळावा या मागण्यांसाठी सेलू शहरातील नागरिकांच्या वतीने मंगळवार 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता श्री लोकमान्य टिळक पुतळा येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी मोर्चेकर्यांच्यावतीने प्रशासनास आपल्या मागण्यांसदर्भातील निवेदन देण्यात येणार आहे.
शहराची शांतता आणि सुसंस्कृत परंपरा अबाधित ठेवण्यासाठी तसेच महिलांमध्ये आणि मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मूक मोर्चात सर्व स्तरांतील पुरुष, महिला, तरुण-तरुणींनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. मोर्चा शांततेत आणि वेळेवर निघणार असून त्यामध्ये कसल्याही प्रकारच्या घोषणा दिल्या जाणार नाहीत. शिस्त, संयम आणि शांततेचा संदेश देत हा मोर्चा पार पाडण्यात येणार आहे.
सेलू शहर बंद ठेवण्यात येणार नाही. मोर्चादरम्यान आयोजकांनी दिलेल्या सूचनांचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिकाधिक नागरिकांचा सहभाग व्हावा यासाठी या मोर्चाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापकपणे प्रसारित करण्यात आली आहे. सहकुटुंब सहभागी होऊन आपल्या शहरातील महिलांना आणि मुलींना सुरक्षिततेचा संदेश द्यावा, तसेच अशा घटनांवर समाजाने संवेदनशीलपणे प्रतिक्रिया द्यावी, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.



