नावघाट पुलावर सेफ्टी ग्रिल बसविण्याची नागरिकांची मागणी – अपघातानंतर संतापाची लाट

नांदेड (प्रतिनिधी) : गोदावरी नदीवरील नावघाट पूल अत्यंत धोकादायक अवस्थेत असून, या पुलावर संरक्षण जाळी (सेफ्टी ग्रिल) बसविण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. पुलाची उंची कमी असल्याने नदीचा पाणीपातळी वाढली की पूल बुडून जातो किंवा पाण्याच्या प्रवाहाच्या अगदी जवळून वाहतो, त्यामुळे प्रवाशांना जीवाचा धोका निर्माण होतो.
पुलावर संरक्षणासाठी जाळी नसल्याने पादचारी व वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. नुकतेच ६ ऑक्टोबर २०२५ रोजी एका मुलाचा पाय घसरून तो नदीत पडला आणि तीव्र प्रवाहामुळे वाहून गेला. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महापालिकेकडे निवेदन देत **नावघाट पुलावर तातडीने सेफ्टी ग्रिल बसविण्याची मागणी केली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, यापूर्वीही या पुलावर अनेकदा अपघात घडले असून, प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.



