मराठवाडा व्यापी आंदोलनाची लाट -अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचे ढोलबजाव आंदोलन; ५० हजार अनुदान व कर्जमाफीची मागणी

लोहा (प्रतिनिधी): मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे बसलेल्या फटक्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना (उबाठा) तर्फे मराठवाडा व्यापी आंदोलनाचा भाग म्हणून लोहा येथील तहसील कार्यालयासमोर ढोलबजाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रत्येक शेतकऱ्याला ५० हजार रुपयांचे सरसकट अनुदान आणि कर्जमाफीची अंमलबजावणी या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा माजी पंचायत समिती सभापती सतीश पाटील उमरेकर यांनी केले. यावेळी सिनेट सदस्य डॉ. नवनाथ बापू चव्हाण, शिवसेना जिल्हा संघटक सुरेश पाटील हिलाल, विधानसभा प्रमुख वसंत पाटील शिंदे, तालुका प्रमुख बालाजी गाडेकर, भिमराव शिंदे, पदमाकर पाटील सावंत, धुराजी नावंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आर्थिक, सामाजिक हालअपेष्टांबद्दल वक्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत जाहीर करून त्यांच्या जिवनावश्यक गरजांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनाने तहसील परिसर दणाणून सोडला असून, शिवसेनेच्या या लढ्यामुळे प्रशासनावर तातडीने निर्णय घेण्याचा दबाव निर्माण झाला आहे. (छायाचित्र – विनोद महाबळे)



