विमानतळ डी.बी. पथकाची उत्कृष्ट कामगिरी – जबरी चोरी व दुचाकी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

नांदेड (प्रतिनिधी): विमानतळ पोलिसांनी जबरी चोरी व मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करून तब्बल चार गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ६०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक आरोपीचे नाव गणेश राजाराम हिवराळे (वय २७ वर्षे, व्यवसाय – बेकार, रा. शिवनगर, नांदेड) असे आहे.
अभिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी “ऑपरेशन फ्लश आऊट” या विशेष मोहिमेअंतर्गत विविध गुन्ह्यांचा तपास करून त्यांचा उलगडा करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते.
दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी विमानतळ पोलीस ठाण्याचे डी.बी. पथक गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, आनंदनगर परिसरात एक सराईत आरोपी चोरीचा मोबाईल व मोटारसायकलसह थांबलेला आहे.
या माहितीच्या आधारे पथकाने वरिष्ठांना कळवून तत्काळ कारवाई केली आणि आनंदनगर येथे धाड टाकून आरोपीस ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने आपले नाव गणेश राजाराम हिवराळे असे सांगितले. त्याच्या ताब्यातील मोटारसायकल व अंगझडती घेतल्यावर तीन चोरीचे मोबाईल, रोख रुपये १,०००/- असा एकूण ६०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
तपासाअंती विमानतळ पोलीस ठाण्यातील जबरी चोरीचे दोन, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील एक जबरी चोरीचा, तसेच एक मोटारसायकल चोरीचा असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याकडून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास **सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे (पो. स्टे. विमानतळ) हे करीत आहेत.
अभिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी या कामगिरीबद्दल संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले आहे.
–



