विमानतळ डी.बी. पथकाची मोठी कामगिरी – मोटारसायकल चोरी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी): विमानतळ पोलिसांच्या डी.बी. पथकाने चोरीच्या मोटारसायकली विक्रीसाठी ठेवणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पकडून तब्बल १० चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ६ लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक आरोपीचे नाव रमेश श्यामराव कायापाक (वय ४१ वर्षे, व्यवसाय – बेकार, रा. कोठारी, ता. किनवट, जि. नांदेड) असे आहे.
अभिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आदेश दिले होते.
दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी सुमारास विमानतळ पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या मोटारसायकली किनवट तालुक्यातील परिसरात विक्रीसाठी आणल्या जात आहेत. ही माहिती वरिष्ठांना कळवून डी.बी. पथकाने तात्काळ कार्यवाही सुरु केली.
दोन दिवस सातत्याने सायबर सेलच्या मदतीने शोधमोहीम राबवून अखेर ९ ऑक्टोबर २०२५ रोजी खात्रीलायक माहिती मिळाली की सराईत गुन्हेगार रमेश श्यामराव कायापाक आपल्या घराशेजारी चोरीच्या मोटारसायकली ठेवून विक्रीची तयारी करीत आहे. सदर ठिकाणी छापा टाकल्यावर आरोपीच्या ताब्यातून एकूण १० मोटारसायकली मिळून आल्या. चौकशीत आरोपीने कबुली दिली की या सर्व मोटारसायकली त्याने गेल्या ८ ते १० महिन्यांत नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरल्या आहेत.
सदर आरोपीस आणि जप्त मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून, आतापर्यंत अनेक गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे सुरू आहे.



