नांदेड सायबर पोलिसांचे कौतुकास्पद यश 150 हरवलेले मोबाईल शोधून मालकांना परत

नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड जिल्हा पोलीस दलातील सायबर शाखेने मिसिंग प्रकरणांमध्ये हरवलेले तब्बल 150 अँड्रॉईड मोबाईल फोन शोधून हस्तगत केले असून हे सर्व मोबाईल त्यांच्या मालकांना परत करण्यात आले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत 20 लाख 10 हजार रुपये इतकी आहे.
नांदेड पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने विविध तक्रारींतील मोबाईलचा शोध घेण्याचे काम हाती घेतले होते. काटेकोर तपास, तांत्रिक माहितीचा वापर आणि सायबर ट्रॅकिंगच्या साहाय्याने पोलिसांनी हे मोबाईल शोधून काढले. आज हे सर्व मोबाईल त्यांच्या मालकांना परत देण्यात आले.
या वेळी पोलीस अधीक्षक अभिनाशकुमार आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव उपस्थित होते. शोध लागलेल्या मोबाईलचे IMEI क्रमांक व इतर माहिती नांदेड पोलिसांच्या अधिकृत Facebook Page आणि Twitter वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांना आपल्या मोबाईलविषयी माहिती पडताळून ते परत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच नागरिकांनी मोबाईल हरवल्यास ताबडतोब CEIR पोर्टल (Central Equipment Identity Register) वर गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती नोंदवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
ही संपूर्ण कारवाई सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम. बी. चव्हाण, अंमलदार दीपक ओढणे, महेश बडगु, कांचन कसबे, शुभांगी जाधव, दाविद पिडगे, काशिनाथ कारखेडे, व्यंकटेश सांगळे, ज्ञानेश्वर यन्नावार, दीपक राठोड आणि साई शेंडगे यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली.



