जागतिक हात धुवा दिनानिमित्त बळीरामपूर येथे विशेष जनजागृती अभियान संपन्न
केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने कलापथक कार्यक्रम व जनजागरण रॅलीचे आयोजन

नांदेड, – १५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, नांदेड यांच्या वतीने नांदेड तालुक्यातील बळीरामपूर येथे आज स्वच्छतेवर आधारित विशेष प्रसिद्धी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला स्वच्छ भारत कक्षाचे माहिती शिक्षण व संवाद तज्ञ मिलिंद व्यवहारे, केंद्रीय संचार ब्युरोचे प्रसिद्धी प्रमुख सुमित दोडल, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व्ही. बी. कांबळे, आर. पी. केंद्रे, डॉ. विवेक पदमने,
पांचाळ, शाहीर बाबुराव जमदाडे, ग्रामसेविका शारदा आळणे तसेच महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकर पवळे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित या विशेष कार्यक्रमात मिलिंद व्यवहारे व चंद्रमुणी कांबळे यांनी विद्यार्थ्यांसमोर व ग्रामस्थांसमोर हात धुण्याचे महत्त्व प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून स्पष्ट केले. डॉ. विवेक पदमने यांनी हात न धुतल्यामुळे होणाऱ्या आजारांबाबत माहिती दिली.
तसेच शाहीर बाबुराव जमदाडे यांच्या गीतमोह कलासंचाने कलापथकाच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. सादर करण्यात आलेल्या स्वच्छता विषयक गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमापूर्वी महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला मिलिंद व्यवहारे यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावात स्वच्छतेच्या घोषणा देत ग्रामस्थांमध्ये जनजागृती निर्माण केली. या रॅलीत सुमारे ४०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमित दोडल यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रामसेविका शारदा आळणे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप सर्व उपस्थितांनी घेतलेल्या स्वच्छता शपथेसह करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक पोवळे, एस.टी वाघमारे, व्ही.आर. लोखंडे, बी.एस वळसे, व्ही.एस. कदम, एस.एन. जाधव यांच्यासह गावकरी यांची मोठ्यासंख्येने उपस्थित होते.



