सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने घेतले धक्कादायक वळण
आरोपी पोलिस अधिकारी निलंबित; मुख्यमंत्र्यांचे तात्काळ कारवाईचे आदेश

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने आता अत्यंत धक्कादायक वळण घेतले आहे. आत्महत्या केलेल्या डॉक्टरने स्वतःच्या हातावर आत्महत्येचे कारण लिहिले असल्याचे उघड झाले असून, त्या लेखनात दोन जणांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून संपूर्ण अहवाल मागवला आणि संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर आरोपी पोलिस अधिकारी गोपाल बदने याचे तात्काळ निलंबन करण्यात आले असून, प्रकरणातील दुसरा आरोपी प्रशांत बनकर (सामान्य नागरिक) फरार आहे.
SP तुषार दोशी यांची प्रतिक्रिया
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले, “या प्रकरणात आम्ही गुन्हा दाखल केला आहे. एक आरोपी पीएसआय गोपाल बदने हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत होता, तर दुसरा आरोपी प्रशांत बनकर हा नागरी व्यक्ती आहे. गोपाल बदने याला निलंबित केले आहे. दोघांना अटक करण्यासाठी दोन पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.”
राज्य महिला आयोगाची भूमिका
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “घटना अत्यंत निंदनीय आहे. पोलीस हे समाजाचे रक्षक असतात, त्यांनीच असे घृणास्पद कृत्य करणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत आणि ते दोघेही सध्या फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. आम्ही स्वतः या प्रकरणाचा पाठपुरावा करू, आणि आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न करू.”
गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांचे विधान
या घटनेवर प्रतिक्रिया देताना गृह राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, “फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केली असून सुसाईड नोट मिळाली आहे. त्यात दोन पोलिस अधिकाऱ्यांची नावे नमूद आहेत. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या आणि कायदेशीर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”
घटनेचा पुढील तपास सुरू
या धक्कादायक घटनेने वैद्यकीय तसेच पोलीस क्षेत्रात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचा पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर अनेक महत्त्वाचे तपशील स्पष्ट होण्याची शक्यता आहे. जिल्हा पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत असून दोषींवर कठोर कारवाई होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



