अंतरराज्य सराईत मोटारसायकल चोर गुन्हेगार अटक – नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी!
एकूण ११ मोटारसायकली जप्त - किंमत ५ लाख १० हजार रुपये


नांदेड (प्रतिनिधी): नांदेड जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या मालिकेत उघडकीस आलेल्या अंतरराज्य सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने (स्थागुशा) अखेर जाळ्यात पकडले आहे. पोलिसांनी या आरोपीकडून एकूण ५,१०,००० रुपये किंमतीच्या ११ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
अटक आरोपीचे नाव: रमेश श्यामराव कयापाक (वय ३८ वर्षे, व्यवसाय: बेकार, रा. तरोडा खुर्द बेलानगर, नांदेड, ह.मु. कोठारी ता. किनवट, जि. नांदेड).
जप्त मुद्देमाल: वेगवेगळ्या कंपनींच्या ११ मोटारसायकली, एकूण किंमत – ५,१०,०००/-
पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी नांदेड जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय यांना विशेष तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थागुशा नांदेडचे सपोनि रवि वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.

११ नोव्हेंबर २०२५ रोजी गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली की बेलानगर, नांदेड येथे एका इसमाने चोरीच्या मोटारसायकली झुडपांमध्ये लपवून ठेवल्या आहेत. या माहितीनुसार सपोनि रवि वाहुळे आणि त्यांच्या टीमने तत्काळ छापा टाकून आरोपी रमेश कयापाकला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडून ११ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
चौकशीदरम्यान आरोपीने कबुली दिली की, त्याने या मोटारसायकली नांदेड जिल्ह्यातील विविध भागांतून तसेच तेलंगणा राज्यातून चोरी केल्या. पोलिसांनी त्याच्याकडून ११ मोटारसायकली हस्तगत करून एकूण ₹५,१०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अभिलेख तपासात उघड झाले की आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे शिवाजीनगर, वजीराबाद, मुदखेड आणि तामसा येथे चोरीचे गुन्हे आधीच दाखल आहेत. पुढील तपासासाठी आरोपी व मुद्देमाल पोलीस ठाणे शिवाजीनगर यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा सराईत चोरांच्या टोळीचा पर्दाफाश झाला असून नांदेड पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.



