जबरी चोरी आणि स्नॅचिंग करणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना नांदेड पोलिसांनी पकडले
एकूण ३,०८,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त - स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई


नांदेड (प्रतिनिधी): नांदेड शहर व परिसरात जबरी चोरी व स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या (स्थागुशा) पथकाने तीन सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्या ताब्यातून एकूण ₹३,०८,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अटक आरोपींची नावे: शेख सोहेफ उर्फ साहील शेख रहीम (वय २३ वर्षे, व्यवसाय मिस्त्री, रा. मेहबुबनगर, नांदेड), शेख सलीम उर्फ सलीम कुत्ता शेख रज्जाक (वय २४ वर्षे, व्यवसाय मजूर, रा. फारुखनगर, नांदेड), शेख एजाज शेख हमीद (वय २३ वर्षे, व्यवसाय मिस्त्री, रा. नुरीचौक, नांदेड)
जप्त मुद्देमाल:
* सोन्याचे दागिने (५ तोळे) – १,४५,०००/-
* नगदी – १३,०००/-
* यामाहा कंपनीची मोटारसायकल (MH-26 CL 2876) – १,५०,०००/-
**एकूण मुद्देमाल: ३,०८,०००/-
“ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी जिल्ह्यातील मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पथके तयार केली.

१० नोव्हेंबर २०२५ रोजी पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड व त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की तीन संशयित युवक काळ्या ड्युक मोटारसायकलवर बसून चोरीचे सोने विक्रीसाठी शंकरराव चव्हाण चौक ते वाजेगाव रोडवरील मातापाक कौर गुरुद्वाऱ्याजवळ थांबले आहेत.
पथकाने तत्काळ छापा टाकून तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी वरील नावाने ओळख दिली. पंचासमक्ष त्यांच्या अंगझडतीतून सोने, नगदी व मोटारसायकल असा एकूण ₹३.०८ लाखांचा मुद्देमाल मिळाला.
चौकशीत आरोपींनी कबुली दिली की, ते गेल्या काही महिन्यांपासून मोटारसायकलवरून जबरी चोरी व स्नॅचिंगचे गुन्हे करत होते. त्यांनी हदगाव, गोकुळनगर आणि माळटेकडी ब्रिज परिसरात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन मुद्देमालासह पुढील तपासासाठी पोलीस ठाणे विमानतळ, नांदेड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.



