शहर वाहतूक शाखेची अवैध प्रवासी वाहतूक व अतिक्रमणाविरुद्ध धडक कारवाई


नांदेड – शहरात वाढत चाललेल्या वाहतूक समस्यांना आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखा, इतवारा यांच्या वतीने अवैध प्रवाशी वाहतूक, विना वाहनपरवाना चालणारी वाहने तसेच रस्त्यावरील अतिक्रमण करणाऱ्या फळ गाड्यांवर मोठी मोहीम राबविण्यात आली.
पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी शहरात विनापरवाना/परमिट चालणारी वाहने, भरधाव वेगाने धावणारे वाहनचालक, फटाका बुलेट, अवैध प्रवासी वाहतूक तसेच रस्त्यांवरील अतिक्रमण यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. जगन पवार यांनी स्टाफ व दंगल नियंत्रण पथकाच्या अंमलदारांसह जुणा मोंढा, हबीब टॉकीज, बर्की चौक, देगलुर नाका ते माळटेकडी या मार्गावर विशेष मोहीम राबविली.
या मोहिमेदरम्यान वाहनांची तपासणी करण्यात आली असून ऑटोचालकांना आवश्यक ते गणवेश परिधान करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच रस्त्यांवर अडथळा निर्माण करणाऱ्या फळ गाड्यांवर तातडीची कारवाई करण्यात आली. या एकदिवसीय विशेष मोहिमेत अवैध प्रवाशी वाहतूक व इतर गुन्हे अशा मिळून एकूण 95 प्रकरणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली.
शहरात वाढत्या वाहतूक कोंडीत नागरिकांकडून मिळणाऱ्या सहकार्याला विशेष महत्व असल्याचे पोलीस विभागाने सांगितले. वाहनचालकांनी चारचाकी व दुचाकी अनियमित पद्धतीने रस्त्याच्या कडेला उभी न करता अधिकृत पार्किंगमध्ये उभी करावीत, रस्त्यात फळ गाड्या किंवा इतर अतिक्रमण करून वाहतूक अडथळा निर्माण करू नये, सिग्नलचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. अन्यथा मोटार वाहन कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.




