वाळू तस्कर स्वप्नील चौदंते यास MPDA अंतर्गत एक वर्षासाठी हार्सल कारागृहात स्थानबद्ध

नांदेड – जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘2+ स्कीम’ अंतर्गत वाळू तस्करी करणाऱ्या गुन्हेगारावर MPDA कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात आली आहे. स्वप्नील दिलीप चौदंते (वय 23, रा. नई आबादी, मुदखेड) यास एक वर्षासाठी हार्सल मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबद्ध करण्यात आले.

गुन्हेगार स्वप्नील चौदंते हा गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा व तस्करी करून त्याची चोरटी विक्री करत होता. या बेकायदेशीर कृत्यांमुळे नदीपात्राचे नुकसान, पर्यावरणीय असंतुलन आणि सार्वजनिक सुव्यवस्थेत अडथळे निर्माण होत असल्याने त्याच्यावर पूर्वीही गुन्हे दाखल होते. वारंवार चेतावणी व कारवाई असूनही त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती कायम राहिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सदर गुन्हेगाराविरुद्ध MPDA अंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक श्री. ओमकांत चिंचोलकर यांनी मा. पोलीस अधीक्षक नांदेड श्री. अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. प्रस्तावातील आवश्यक दुरुस्त्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय यांनी पाहिल्या. त्यानंतर मा. जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी नांदेड श्री. राहुल कर्डिले यांनी दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानबद्धतेचे आदेश जारी केले.
जिल्ह्यातील अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीमा सतत राबविल्या जात आहेत. या मोहिमेत आतापर्यंत अनेक गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात आली असून हे पाऊल त्याच मोहिमेचा एक भाग असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नांदेड जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मागील दोन वर्षांत पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. सन 2024 मध्ये 13 तर 2025 मध्ये 32 सराईत गुन्हेगारांना MPDA अंतर्गत कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 आणि 56 अंतर्गत एकूण 170 हून अधिक गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या समन्वयातून झालेली ही कारवाई संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्श ठरत असून “कायद्यापुढे कोणीही मोठा नाही” हा संदेश पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला आहे.



