समंदरवाडीत मनरेगा अंतर्गत जलतारा कामाचा शुभारंभ;
शाश्वत शेतीसाठी जलतारा तंत्र महत्त्वाचे- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


नांदेड,21- जमिनीचा वापसा होण्यासाठी व भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्यासाठी जलतारा हे अत्यंत सोपे व परिणामकारक तंत्र असून, शाश्वत शेतीसाठी ते जीवनदायी ठरणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
आज भोकर तालुक्यातील समंदरवाडी येथे मनरेगा अंतर्गत जलतारा कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, नरेगा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, गटविकास अधिकारी, सरपंच तुकाराम वागतकर, उपसरपंच शकुंतलाबाई खुपसे, सेवा समर्पणचे विठ्ठल फुलारी, दिगंबरराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्यासाठी जिल्ह्यात एक लाख जलतारे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा नावीन्यपूर्ण उपक्रम नांदेड जिल्ह्यात प्रभावीपणे राबवला जात आहे. सासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जलतारा तंत्रामुळे जलद निचरा होतो तसेच पाणी जमिनीत खोलवर मुरुन शेतीला फायतद होतो असेही ते म्हणाले.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली म्हणाल्या, पाणी व मातीबाबत आपण दुर्लक्ष करत आहोत. काळी, कसदार जमीन आज कमी होत चालली आहे. भूजलाचा उपसा आपण करतो, परंतु त्याची भरपाई जमिनीत पाणी मुरवून करत नाही. त्यामुळे पाणी पातळी खोलवर जात आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जलतारा तयार करून पाणी जमिनीत परत देण्यावर भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड यांनीही जलतारा तंत्राची गरज, कार्यपद्धती व फायदे याबाबत ग्रामस्थांना सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून सूचना व मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार नरेगाचे राहुल पाटील, मिलिंद व्यवहारे, माधवराव माजळकर, कृष्णा वागतकर, दिलीप जाधव, भक्तीराम वागतकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी माधव मुसळे यांनी केले.



