सायबर पोलीस स्टेशन नांदेडची जलद कारवाई – तक्रारदाराचे 4,00,000 रुपये परत मिळवून दिले

नांदेड | सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असताना सायबर पोलीस स्टेशन नांदेड यांनी दाखवलेली सतर्कता आणि तात्काळ प्रतिसादामुळे एका तक्रारदाराचे 4,00,000 रुपये अवघ्या 72 तासांत परत मिळवण्यात यश आले आहे.
प्रकरणाचा तपशील दि. 15 नोव्हेंबर 2025 रोजी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रारदाराने (तक्रार क्रमांक 31911250218570) 4 लाख रुपयांच्या ऑनलाइन फसवणुकीची तक्रार नोंदवली होती.
तक्रारदाराला अनोळखी व्हॉटसअॅप नंबरवरून “Axis Bank Reward” नावाची APK फाईल पाठवण्यात आली होती. रिवॉर्ड मिळतील या आशेने त्यांनी ती फाईल उघडली आणि लिंकवर क्रेडिट कार्डची संपूर्ण माहिती भरली. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्याच माहितीचा वापर करून त्यांच्या क्रेडिट कार्डमधून एकूण 4,00,000 रुपये डेबिट केले.

घटनेनंतर तक्रारदाराने सायबर पोलीस स्टेशन नांदेड येथे धाव घेतली. सायबर पोलिसांनी तात्काळ तक्रार नोंदवून, संबंधित बँका आणि पेमेंट गेटवे यांच्याशी संपर्क साधत रकमेवर होल्ड मिळवला. अखेर 72 तासांच्या आत तक्रारदाराची संपूर्ण रक्कम परत करण्यात पोलिसांना यश आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, पोलीस निरीक्षक वंसत सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
प्रत्यक्ष तपास व रक्कम परत मिळवण्याचे कार्य खालील अधिकाऱ्यांनी केले:
पोउपनि. मारोती चव्हाण, पो.कॉ. 1435 काशिनाथ कारखेडे, पो.कॉ. 859 दीपक राठोड, म.पो.कॉ. 3340 शुभांगी जाधव, म.पो.कॉ. 111 कांचन कसबे, पो.कॉ. 1222 ज्ञानेश्वर यन्नावार

नागरीकांसाठी महत्त्वाचे सायबर सुरक्षा संदेश
पोलीस अधीक्षक नांदेड यांनी नागरिकांना खालील सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे:
1. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.
2. अनोळखी APK फाईल डाउनलोड करू नये.
3. OTP, पासवर्ड कोणालाही देऊ नये.
4. सोशल मीडियावरील जास्त नफा देणाऱ्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये.
5. आपली वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये.
6. सोशल मीडिया अकाउंट्समध्ये नेहमी Two-Step Verification ठेवावे.
7. अनोळखी व्यक्तींचे व्हिडिओ कॉल उचलू नयेत.
8. ‘Digital Arrest’ हा एक फसवणुकीचा प्रकार असून त्याला बळी पडू नये.
फसवणूक झाल्यास काय करावे?
तात्काळ 1930 या सायबर हेल्पलाईनवर संपर्क करावा.
किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी.
त्यानंतर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी.
वेळेवर तक्रार नोंदवल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते.



