नवोदितांना संधी देणे ही काळाची गरज -डॉ. राम वाघमारे

नांदेड,23- वाचन संस्कृती कमी होत चाललेल्या या काळात नवोदित साहित्यिकांना योग्य मंच मिळणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रामीण भागात दर्जेदार साहित्यनिर्मिती घडावी आणि नवीन लेखक तयार व्हावेत यासाठी सप्तरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि सप्तरंगी साहित्य महिला मंडळ करत असलेले उपक्रम स्तुत्य आहेत,असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. राम वाघमारे यांनी केले.
नांदेड येथील विसावा हॉटेलमध्ये आज सप्तरंग संस्थेच्या वतीने जागतिक पुरुष दिनानिमित्त आयोजित विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ व कवी संमेलन घेण्यात आले, त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य प्रल्हाद इंगोले होते.
पुढे ते म्हणाले, गेल्या पाच वर्षांत सप्तरंग संस्थेने ग्रामीण साहित्य संमेलन, कवी संमेलन तसेच विविध साहित्यिक उपक्रमांद्वारे नवोदितांना मंच उपलब्ध करून दिला आहे. या मंचातून अनेक नवे साहित्यिक पुढे येत असल्याचे वाघमारे म्हणाले.
पुरुषांचा आत्मसन्मान वृद्धिंगत करण्यासाठी महिला मंडळाने घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी विशेष कौतुक केले. जागतिक पुरुष दिनानिमित्त संस्थेने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा केलेला गौरव ही सामाजिक सकारात्मकतेची खूण आहे, असे ते म्रहणाले.
कार्यक्रमात पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी लोहाळे, प्रा. संजय नरवाडे, अनुरत्न वाघमारे, अभियंता लक्ष्मण लिंगापुरे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी झालेल्या कवी संमेलनात अनेक कवींनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवत आपल्या रचना सादर केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रणजीत गोणारकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. भीमराव दिपके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, रूपाली वागरे, अंजली हिंगोली, सावित्री शेवाळकर, ज्योती परांजपे, प्रतिभा पांडे आदींनी परिश्रम घेतले.



