जिल्हा परिषदेत पेंशन अदालात संपन्न

नांदेड,26- जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली पेंशन अदालात नुकतीच जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाली. निवृत्त शिक्षक व कर्मचारी यांच्या निवृत्तीविषयक प्रलंबित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तसेच विविध प्रशासकीय अडचणींबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यासाठी ही अदालात घेण्यात आली होती.
अदालतीदरम्यान निवृत्तीवेतन प्रस्ताव, जीपीएफ, ग्रॅच्युइटी, रजा रोखीकरण तसेच इतर निवृत्ती लाभांशी संबंधित तक्रारींची माहिती जाणून घेतली. तसेच तत्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभागप्रमुखांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. या पेंशन अदालतीस सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद चन्ना, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी एम. डी. देशमुख, लेखाधिकारी विशाल हिरवे, एम. बी. डवरे, निलकंठ पाचंगे आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळर शिक्षण, आरोग्य, सामान्य प्रशासन तसेच विविध विभागातील पेंशनधारकांची उपस्थिती होती. पेंशनधारक व त्यांच्या संघटनांनी दिलेली निवेदने संबंधित विभागप्रमुखांना देण्यात आली. पेंशन अदालतीत उमंग अॅपवर हयात प्रमाणपत्र स्वीकारणे, सेवानिवृत्तीची निवड श्रेणी यादी प्रकाशित करणे, वरिष्ठ श्रेणी आदेश काढणे, सेवा निवृत्तीचे रजा रोखीकरण अदा करणे, सेवानिवृत्ती लाभ त्वरित उपलब्ध करून देणे अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली.



