आकोल्यात मध्यदिवसात तरुणाची निर्घृण हत्या;
परिसरात खळबळ प्रेमसंबंधातील वादाने आणखी एक जीव घेतला


आकोला, 2 डिसेंबर (डॉ. मोहम्मद रागिब देशमुख): नांदेडमध्ये प्रेमसंबंधातून सक्ष्म ताटे या तरुणाची झालेल्या हत्येची धग अजून ओसरलेली नसतानाच आकोला जिल्ह्यातही तशाच स्वरूपाची हृदयद्रावक घटना घडली आहे. आकोल्यातील शिगाव परिसरात एका तरुणाचा दिवसाढवळ्या चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आला. मृत तरुणाचे नाव गौरव बायसकर असे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चार जणांनी रस्त्यात गौरवला अडवून त्याच्यावर चाकूने सतत वार करत निर्दयपणे हत्या केली. या भीषण हल्ल्यात तो जागीच मरण पावला. घटनेमुळे आकोला शहरात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना शिगाव–आकोट रोडवर घडली. प्रेमसंबंधातील वादातून या हल्ल्याचा उगम झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांचा संबंध लोहरा तालुका, बलापूर (जि. आकोला) येथील मोरे कुटुंबाशी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मोरे कुटुंबातील एका अल्पवयीन मुलाने, त्याच्या वडिलांनी, तसेच दोन साथीदारांनी मिळून गौरव बायसकरचा खून केला.

ही घटना आकोट–शिगाव रोडवरील इंदोरा फाटा या ठिकाणी दुपारच्या सुमारास घडली. दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
उरल पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गौरवचे शव ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले.
प्रथमदर्शनी ही घटना प्रेमसंबंधातील वादातून झाल्याचे मानले जात असले तरी,
खून करण्यामागील नेमकी कारणे काय, याबाबत पोलीस अजूनही तपास करत आहेत.
हल्लेखोरांकडून चौकशी सुरू असून लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
स्थानिकांमध्ये भीती व संताप या निर्घृण हत्येमुळे परिसरातील नागरिकांमध्ये, संताप आणि चिंता यांची लाट निर्माण झाली आहे. या घटनेने जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.



