गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे अटकेचा निषेध; ४ व ५ डिसेंबरला महाराष्ट्र विकास सेवा संघटनेची सामूहिक रजा

नांदेड, ३- आर्वी पंचायत समितीतील मनरेगाच्या प्रकरणात गटविकास अधिकारी सौ. सुनीता मरसकोल्हे यांना झालेल्या कथित नियमबाह्य अटकेच्या निषेधार्थ महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना, नांदेडने ४ व ५ डिसेंबर रोजी दोन दिवसांची सामूहिक रजा जाहीर केली आहे. या कालावधीत कुठलेही शासकीय काम न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संघटनेचे म्हणणे आहे की, प्राथमिक चौकशी न करता आणि महिला अधिकारी असल्याने आवश्यक प्रक्रिया न पाळता करण्यात आलेली ही कारवाई अन्याय्य आहे. तांत्रिक प्रणालीतील त्रुटींसाठी अधिकाऱ्यांना गुन्हेगार धरणे योग्य नसल्याचेही संघटनेने नमूद केले.
संघटनेने इशारा दिला आहे की, राज्याचे मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री व रोहयो मंत्री यांच्या बैठकीत समाधानकारक निर्णय न झाल्यास राज्यभर कामबंद आंदोलन छेडले जाईल. निवेदनावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मोळोदे, प्रकल्प अधिकारी डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गिरी आदी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



