मध्यप्रदेशातील चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
7 गुन्हे उघडकीस; आरोपींकडून 4 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड | प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील मालमत्तेविरोधी गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी मोठी कारवाई करत मध्यप्रदेश येथील चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण 7 चोरीचे गुन्हे उघडकीस आणत आरोपींकडून नगदी 4 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अनिकेश गजेंद्र सिसोदीया (वय 20 वर्षे, व्यवसाय बेकार, रा. मवाखेडी, ता. मंगावली, जि. अशोकनगर, मध्यप्रदेश) असे असून, त्याच्यासोबत एक विधीसंघर्षग्रस्त बालक देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेला मालमत्तेविरोधी गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यात चोरी करणारे आरोपी मध्यप्रदेशातील असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर दोन पथके कार्यरत करण्यात आली. यापैकी एक पथकाने मध्यप्रदेशात तब्बल 10 दिवस स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबवली, तर दुसऱ्या पथकाने नांदेड शहरात सतत पाळत ठेवली.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, 14 डिसेंबर 2025 रोजी नांदेड रेल्वे स्थानकावर सापळा रचून संशयितांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींची अंगझडती व बॅग तपासणीदरम्यान 4,01,000 रुपये रोख रक्कम आढळून आली.
चौकशीत आरोपींनी कबुली दिली की, सदर रक्कम ही त्यांनी अर्धापुर, हदगाव, भाग्यनगर, वजीराबाद, भोकर, किनवट व लोहा या ठिकाणी केलेल्या चोरीतील आहे. आरोपी हे बँकेतून पैसे काढणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेवून तसेच लग्नसमारंभात नजर चुकवून चोरी करण्याचे प्रकार करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
नमूद आरोपी व विधीसंघर्षग्रस्त बालकास मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन अर्धापुर यांच्या ताब्यात देण्यात आले असून, अधिक तपास सुरू आहे.



