राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे बिगूल वाजले 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल

मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी समोर आली असून, राज्यातील मुंबईसह एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज घेतलेल्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यांत घेण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुका घेण्यात आल्या आहेत. त्यांचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला 31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आयोगाने दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांची घोषणा केली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या महापालिका निवडणुकांमुळे राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्यातील 29 महापालिकांपैकी 27 महापालिकांची मुदत आधीच संपली असून, काही महापालिकांची मुदत 2020 ते 2023 या कालावधीत संपलेली आहे. जालना व इचलकरंजी या नवनिर्मित महापालिकांचाही यात समावेश आहे.
मतदान पद्धतीबाबत महत्त्वाची माहिती
मुंबई महापालिकेत एक सदस्यीय प्रभाग रचना असल्याने प्रत्येक मतदाराला एकच मत द्यावे लागणार आहे. तर उर्वरित 28 महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग असल्यामुळे मतदारांना 3 ते 5 उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे.
निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशन अर्ज दाखल : 23 ते 30 डिसेंबर 2025
अर्ज छाननी : 31 डिसेंबर 2025
उमेदवारी माघार : 2 जानेवारी 2026
अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप : 3 जानेवारी 2026
मतदान : 15 जानेवारी 2026
मतमोजणी व निकाल : 16 जानेवारी 2026
या महापालिकांमध्ये होणार निवडणूक
MMR विभाग:
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, भिवंडी, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, पनवेल
पश्चिम महाराष्ट्र:
पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इचलकरंजी
उत्तर महाराष्ट्र:
नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, मालेगाव
मराठवाडा:
छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना
विदर्भ:
नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर



