नवनिर्वाचित नगरसेवक करीम शेख यांच्या विजयाचा लोह्यात भव्य सत्कार

लोहा : लोहा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून करीम शेख यांनी दणदणीत विजय मिळवून नगरसेवक म्हणून निवडून येत परिसरातील नागरिकांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या या यशाबद्दल शहरात आनंदाचे वातावरण असून विविध राजकीय व सामाजिक स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या पार्श्वभूमीवर करीम शेख यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे नांदेड जिल्हाध्यक्ष अन्सारभाई पठाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अन्सारभाई पठाण यांनी करीम शेख यांच्या विजयाचे कौतुक करत, जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरून प्रभागाच्या विकासासाठी काम करतील, असा विश्वास व्यक्त केला.
सत्कारप्रसंगी हनमंत लोंढे सर, शिवसेना शहराध्यक्ष खंडू पाटील पवार, खादरसाब लदाफ, गजू भाऊ शेटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी करीम शेख यांना शुभेच्छा देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमामुळे राजकीय सलोखा आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडले असून, आगामी काळात लोहा शहराच्या विकासाला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. छाया : विनोद महाबळे



