क्राईम

हिंगोली व नांदेडमध्ये डीआयजी पथकाचे छापे

73 लाखांचा गुटखा व 1 कोटी 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या आदेशाने हिंगोली व नांदेड शहरात विशेष कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 72 लाख 93 हजार रुपयांचा गुटखा व चारचाकी वाहने आणि ट्रक असा सुमारे 1 कोटी 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दशरथ तलेदवार व पाच अंमलदारांच्या पथकाने पहाटे हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर हद्दीतील बाळापूर येथे कारवाई करत तीन चारचाकी वाहनांतून वाहतूक होत असलेला 14 लाख 67 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. यासोबतच सुमारे 10 लाख रुपये किमतीची तीन चारचाकी वाहनेही जप्त करण्यात आली. या प्रकरणी करण सदाशिव अवचार (वय 20) व प्रभाकर दिगंबर अवचार (वय 32, रा. भोसी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) यांच्याविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. विष्णुकांत गुट्टे करीत आहेत.

यानंतर पथकाने नांदेड शहरातील इतवारा भागातील एका गोडाऊनवर छापा टाकून 58 लाख 26 हजार रुपयांचा गुटखा तसेच गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा 20 लाख 50 हजार रुपये किमतीचा ट्रक जप्त केला. या प्रकरणी शेख जिबरान शेख मुखीद (वय 26, रा. देगलूर नाका, नांदेड) व गणेश रामराव कऱ्हाळे (वय 26, रा. तिरुपती नगर, धनेगाव, नांदेड) यांना ताब्यात घेण्यात आले असून इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या यशस्वी कारवाईत सपोनि श्री. दशरथ तलेदवार यांच्यासह पोहेकॉ प्रदीप खानसोळे, पोहेकॉ संजीव जिंकलवाड, पो.कॉ. गणेश धुमाळ व पो.कॉ. कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी पथकास 15 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

दरम्यान, या अवैध व्यवसायामागे आणखी कोणाचे पाठबळ आहे का, याचा तपास सुरू असून नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात, nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर किंवा ‘खबर’ हेल्पलाइन 9150100100 वर कळवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *