क्राईम

जबरी चोरीचा गंभीर गुन्हा उघड; 1.10 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे आरोपी अटकेत

 

नांदेड : पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी संयुक्त कारवाई करत जबरी चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस आणला असून चोरीस गेलेले एकूण 1,10,000 रुपये किमतीचे चांदीचे दागिने जप्त केले आहेत. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रवि उर्फ मुंडल भास्कर शिंदे (वय 20, रा. विरेगाव ता. जि. जालना) व भास्कर सायबा शिंदे (वय 55, रा. विरेगाव ता. जि. जालना) अशी आहेत. दोघेही उसतोड मजूर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी आरोपींकडून दोन्ही पायातील 50 तोळे वजनाचे चांदीचे वाळे (अंदाजे किंमत 60,000 रुपये) तसेच हातातील चार चांदीच्या पाटल्या 40 तोळे वजनाच्या (अंदाजे किंमत 50,000 रुपये) असा एकूण 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 4 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास गंगावेट ता. जि. नांदेड येथील माणिका नागोबा इनकर यांच्या शेतातील आखाड्यावर दोन अनोळखी इसमांनी तोंड बांधून हातात कत्ते व लोखंडी रॉड घेऊन घरात घुसखोरी केली. त्यांनी द्रोपदाबाई माणिकराव इनकर (वय 65) व माणिका नागोबा इनकर (वय 90) यांना झोपेतून उठवून लाथाबुक्क्यांनी तसेच कत्ते व रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर द्रोपदाबाई यांच्या हातातील चांदीच्या पाटल्या व पायातील चांदीचे वाळे जबरदस्तीने हिसकावून आरोपी पसार झाले. या घटनेवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी गंगावेट येथील घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याचा तपास वेगाने पूर्ण करून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तपासाची चक्रे फिरवत गोपनीय माहिती व सायबर सेलच्या मदतीने मौजे विरेगाव ता. जि. जालना येथून रवि उर्फ मुंडल भास्कर शिंदे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्याच्याकडून चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. त्यानंतर दुसरा आरोपी भास्कर सायबा शिंदे यालाही ताब्यात घेऊन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी (PCR) मिळविण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार कांबळे करीत आहेत.

या प्रकरणातील आरोपी व मुद्देमालाचा शोध घेण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलीसांच्या तीन पथकांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने विशेष प्रयत्न केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *