क्राईम

नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम तीव्र सात कारवायांत नऊ जण गजाआड; सुमारे ९.४९ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड, दि. १९ (प्रतिनिधी) – कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून नागरिकांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने नांदेड परिक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरुद्ध व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १६ ते ३१ मार्च २०२६ दरम्यान ही विशेष मोहीम सुरू असून, चौथ्याच दिवशी पोलिसांनी जोरदार कारवाया केल्या आहेत.

या मोहिमेअंतर्गत गुटखा विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध आणखी ७ गुन्हे नोंदविण्यात आले असून, एकूण ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील इतवारा, शिवाजीनगर, देगलूर व हिमायतनगर या चार पोलीस ठाण्यांसह परभणी जिल्ह्यातील कोतवाली, दैठणा व गंगाखेड या तीन पोलीस ठाण्यांनी संयुक्तपणे या कारवाया केल्या. या कारवायांमध्ये भारतीय न्याय संहिता कलम १२३ अंतर्गत एकूण ७ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

सदर कारवायांदरम्यान आरोपींकडून एकूण ९ लाख ४९ हजार ५९९ रुपये किंमतीचा गुटखा व इतर प्रतिबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांकडून सांगण्यात आले की, स्वादिष्ट/सुगंधित तंबाखू, अपमिश्रित चघळण्याची तंबाखू, गुटखा, पान मसाला, खर्रा, मावा यांसारख्या पदार्थांची साठवण, वितरण व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. भारतीय न्याय संहिता कलम १२३ अंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये सत्र न्यायालयात खटला चालत असून, दोषी आढळल्यास १० वर्षांपर्यंत कारावास व दंडाची तरतूद आहे.

दरम्यान, काही ठिकाणी गुटखा सेवन करणारे ग्राहक स्थानिक पुरवठादारांना फोनद्वारे मागणी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, अशा प्रकारांवरही लक्ष ठेवून कारवाई करण्यात येत आहे.

नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना देण्यासाठी ‘खबर’ हेल्पलाइनचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ९१ ५० १०० १०० या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे माहिती देता येणार असून, माहिती देणाऱ्याची गोपनीयता राखली जाईल, असे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी स्पष्ट केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *