क्राईम

नांदेड परिक्षेत्रात चंदन तस्करांवर मोठी कारवाई – ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

नांदेड : अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी कार्यरत असलेल्या पोलीस उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाने चंदन तस्करांविरोधात मोठी कारवाई करत सुमारे ५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे तस्करीच्या जाळ्यावर मोठा आघात बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमार्गे मध्यप्रदेशातील बुन्तानपुरकडे एका आयशर वाहनातून चंदनाची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार, दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी पहाटे नांदेड जिल्ह्यातील लोहा-नांदेड रोडवरील साई हॉटेलजवळ सापळा रचण्यात आला.

पथकाने संशयित आयशर वाहन अडवून तपासणी केली असता, सुरुवातीला वाहन रिकामे असल्याचे दिसून आले. मात्र सखोल तपासणीदरम्यान वाहनाच्या बॉडीमध्ये चालकाच्या पाठीमागे सुमारे तीन फूट जागेत सहा फूट उंचीचा गुप्त कप्पा तयार करण्यात आल्याचे आढळले. त्या कप्प्यात ताडपत्रीखाली गोण्यांमध्ये चंदन लाकूड लपवून ठेवले होते.

गोण्या बाहेर काढून वजन केल्यावर सुमारे १,४७० किलो वजनाचे चंदन लाकूड आढळून आले, ज्याची किंमत सुमारे ३६.७५ लाख रुपये आहे.

या प्रकरणी आयशर वाहन, चंदन लाकूड व रोख ११ हजार रुपये असा एकूण ५१.९६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान चालक तौफिक चांदपाशा देशमुख (रा. चापोली, ता. चाकूर, जि. लातूर) व सोबती तुकाराम शेषराव सुंदराळे (रा. आनंदवाडी, ता. चाकूर) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी हे चंदन रामदास शेषराव कुंदराजे (रा. आनंदवाडी) व बाळासाहेब जाधव (रा. केज, जि. बीड) यांनी वाहनात भरून दिल्याची माहिती दिली.

या प्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), तसेच भारतीय वन अधिनियम कलम ४१, ४२ व वृक्षतोड अधिनियम कलम ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पांचाळ करीत आहेत.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचारी प्रदीप खानसोळे, संजीव निकलवाड, गणेश धुमाळ व कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहानी उमाप यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

‘खबर’ हेल्पलाइनचा वापर करण्याचे आवाहन
अवैध व्यवसायांची माहिती देण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने ‘खबर’ हेल्पलाइन सुरू केली असून ९१ ५० १०० १०० या क्रमांकावर नागरिकांनी फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *