तिहेरी खूनानंतर पुन्हा मध्यरात्री आणखी एक खून

नांदेड : शहरात नुकत्याच घडलेल्या तिहेरी खून प्रकरणाची धास्ती अद्याप कमी झालेली नसतानाच, मंगळवारी उशिरा रात्री आणखी एका खुनाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे नांदेड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रज्जूसिंह उर्फ रंजीतसिंह तबेलेवाले याचा मुरमुरा गल्ली परिसरात तलवारीने वार करून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात मनप्रीत सिंह कांचवाले आणि त्याचा भाऊ यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला असून, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, सलग घडणाऱ्या या गंभीर गुन्ह्यांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.



