नांदेडमध्ये पोलीस उप महानिरीक्षक पथकाच्या धाडी; नकली जर्दा कारखाना उद्ध्वस्त, देगलूरात जुगार अड्ड्यावर छापा – 7.37 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने नांदेड जिल्ह्यात धाडसत्र राबवत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अर्धापूर येथे नकली जर्दा बनविणाऱ्या इसमाचा पर्दाफाश करण्यात आला असून, देगलूर येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोन्ही कारवायांत एकूण 7 लाख 37 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरानगर परिसरात सय्यद जाकीर ऊर्फ बाबा गुलाम दस्तगीर (वय 40) हा नकली सुगंधित जर्दा तयार करत असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यानुसार छापा टाकण्यात आला असता, त्या ठिकाणी जर्दा तयार करण्याचे साहित्य, मशीन, ग्लिसरीन व पॅराफिन असा एकूण 3 लाख 44 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हा कमी प्रतीच्या जर्दामध्ये रसायने मिसळून नामांकित कंपनीच्या नावाने सुगंधित जर्दा तयार करून बाजारात विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 196/2026 कलम 123 भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोहेका संतोष काळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
तत्पूर्वी, 12 एप्रिल 2026 रोजी देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौते कुशावाडी शिवारात रंजित भाऊराव इंगोले यांच्या शेतातील खोलीत सुरू असलेल्या ‘तिरंट’ जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून 36 हजार 343 रुपये रोकड, 8 मोबाईल फोन व 7 मोटारसायकली असा एकूण 3 लाख 93 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 181/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोउपनि महाजन मैसनवाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
या संयुक्त कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती गोपनीयपणे ‘खबर हेल्पलाइन’ क्रमांक 91 50 100 100 वर देण्याचे आवाहनही पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.



