संविधानातील मूल्ये तळागाळापर्यंत रुजविणे हेच खरे बाबासाहेबांना अभिवादन
मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचे प्रतिपादन

नांदेड,14- प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान तयार करून मानवतेचे मूलभूत अधिकार दिले. त्यांनी सामाजिक व आर्थिक समतेची मूल्ये रुजवली तसेच स्त्री-पुरुष समानतेचा अधिकार प्रदान केला. संविधानातील या मूल्यांची प्रभावी अंमलबजावणी तळागाळापर्यंत करणे, हेच खरे बाबासाहेबांना अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित अभिवादन कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, डी.बी. गिरी, अमित राठोड, मयूरकुमार आंदेलवाड, प्रशांत थोरात, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, नियोजन शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे, अवधूत गंजेवार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले, कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, अशोक भोजराज, संजय शिंदे, कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, लेखाधिकारी निळकंठ पांचगे, विशाल हिवरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यातून संविधानातील न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांची जपणूक करावी. गावपातळीवर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केवळ एक दिवस साजरी करून न थांबता, त्यांच्या विचारांची अंमलबजावणी दैनंदिन कामकाजातून व्हावी. तरुणांनी बाबासाहेबांना समजून घेण्यासाठी त्यांचे साहित्य वाचून चिंतन करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी लेखाधिकारी निळकंठ पांचगे यांनी आपले संविधान-आपला स्वाभिमान या विषयावर मार्गदर्शन करत संविधान निर्मितीचा प्रवास उलगडून सांगितला. प्रत्येक घरात संविधान असावे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मिलिंद व्यवहारे यांनी केले. या कार्यक्रमाला रंजीत गजभारे, राजेश जोंधळे, धनंजय गुम्मलवार, विजय वाघमारे, पवन तलवारे, राघवेंद्र मदनुरकर, बालाजी नागमवाड, अशोक मोकले, सचिन चौधरी, छाया कांबळे, नंदलाल लोकडे, प्रमोद गायकवाड, संजय वाठोरे, बालाजी टोके, उमाकांत हळे, सुनील वाघमारे, रामदास शेकापुरे, दिलीप महालिंगे, गणेश आंबेकर, उज्वला गजभारे, स्वाती जोंधळे, प्रेमला चौदंते, बालाजी आवर्दे, गजानन आगरमोरे यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान सकाळी जिल्हा परिषदेच्या परिसरातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास भव्य पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेतर्फे अन्नदान व पाणी वाटप उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.



