नांदेडमध्ये अवैध अग्नीशस्त्रासह तरुण ताब्यात; ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (दि. १५ एप्रिल २०२६) – नांदेड शहरात अवैध अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक करत त्याच्याकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतूस असा एकूण ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रितम ऊर्फ बबलुलाला पि. आनंद लोखंडे (वय २२, रा. संघसेन नगर, इतवारा, नांदेड) असे आहे. त्याच्याकडून एक लोखंडी गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नांदेड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत अवैध अग्नीशस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रवि वाहुळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी प्रितम लोखंडे हा गावठी पिस्टल विक्रीच्या उद्देशाने बाळगत असल्याचे समजले. त्यानुसार संघसेन नगर, इतवारा परिसरात सापळा रचून छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान आरोपी ताब्यात घेण्यात आला असून त्याच्याकडून विनापरवाना बेकायदेशीररित्या बाळगलेले अग्नीशस्त्र व काडतूस जप्त करण्यात आले.
सदर आरोपीला पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन इतवारा, नांदेड यांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.



