नांदेड शहरात ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत कोंम्बिंग ऑपरेशन; 11 दिवसांत 134 पेक्षा अधिक आरोपींवर कारवाई

नांदेड, दि. 23 (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील चोरी व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत व्यापक कोंम्बिंग ऑपरेशन राबवले असून, अवघ्या 11 दिवसांत 134 पेक्षा अधिक आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. ऑन रेकॉर्ड गुन्हेगारांपैकी अनेकांची ‘राउंडिंग अप’ करून सखोल तपासणी मोहीमही सुरू करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 22 एप्रिल 2026 रोजी रात्री 11.00 वाजल्यापासून ते दि. 23 एप्रिल 2026 रोजी पहाटे 3.00 वाजेपर्यंत विशेष कोंम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी (नांदेड शहर, इतवारा, देगलूर, नांदेड ग्रामीण), स्थानिक गुन्हे शाखा तसेच विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
या कारवाईदरम्यान मालमत्तेविरुद्ध व शरीराविरुद्ध गुन्हे करणारे, अवैध शस्त्र बाळगणारे, हद्दपार/तडीपार आरोपी, हिस्ट्रीशीटर, फरारी गुन्हेगार यांची कसून तपासणी करण्यात आली.
कारवाईचा आढावा :
तडीपार गुन्हेगारांची तपासणी – 55 ते 56
MPDA अंतर्गत सुटलेले गुन्हेगार – 102
मालमत्ता व शरीराविरुद्धचे सराईत गुन्हेगार – 39
इतर तपासणी – 24
आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हे – 4
मपोका कलम 122 अंतर्गत गुन्हे – 2
याशिवाय विविध पोलीस ठाण्यांत आर्म अॅक्ट कलम 4/25 व मपोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण आरोपींवर ठोस कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, दि. 6 ते 13 एप्रिल तसेच 16, 19, 21 आणि 22 एप्रिल रोजीही शहरात कोंम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी राबवण्यात आली होती. या कालावधीत मपोका कलम 55 अंतर्गत 13 व कलम 56/57 अंतर्गत 30 हद्दपार आरोपींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 8 आरोपी शहरात आढळून आल्याने त्यांच्या विरोधात मपोका कलम 142 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
तसेच MPDA मधून सुटलेले व सराईत गुन्हेगारांवर कारवाई करताना 107 आरोपींवर कारवाई करून 93 गुन्हे नोंदवण्यात आले. कलम 110/117 मपोका अंतर्गत 14 इसमांवर तर कलम 12(अ) अंतर्गत 5 इसमांवर कारवाई करून एकूण 4,72,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाकडून अशा प्रकारच्या मोहिमा सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.



