डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व समाजांचे प्रेरणास्थान- डॉ. राम वाघमारे

अर्धापूर, 26- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नव्हे, तर सर्व समाजांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या समतेच्या, शिक्षणाच्या आणि मानवतेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर आहे, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. राम वाघमारे यांनी केले.
अर्धापूर येथील डॉ. आंबेडकर नगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. राम वाघमारे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, प्रवीण देशमुख, छत्रपती कानोडे, मुस्सवीर खतीब, व्यंकटी साखरे, दीपक मगर, दिलीप देशमुख, विलास साबळे, शेख मकसूद शेख वजीर, सुनील वानखेडे, बाबासाहेब देशमुख, व्यंकटी राऊत, सोनाजी सरोदे, सखाराम क्षीरसागर, सुभाष लोणे, सुनील लोणे, मोहम्मद गौस कुरेशी, फिरोज पठाण, मुख्तदीर पठाण, कामाजी आटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात डॉ. वाघमारे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी प्रसंगांचा उल्लेख केला. भीमजयंती साजरी करताना केवळ एक दिवसाचा उत्साह न ठेवता, तो वर्षभर टिकवला पाहिजे. बाबासाहेबांप्रमाणे वाचन संस्कृती वाढवून समाजप्रबोधनासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी प्रज्ञा बुद्ध विहार येथे मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. समता सैनिक दलाने ध्वजास सलामी दिली. त्यानंतर गाथा पठनाचा कार्यक्रम पार पडला.
जयंती मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा पुष्पहार व पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष उमेश सरोदे, उपाध्यक्ष भीमराव सरोदे, सचिव प्रशांत कांबळे तसेच अरविंद कांबळे, गौरव सरोदे, संतोष बहादूरे, प्रकाश सरोदे, राजेंद्र कांबळे व महेश सरोदे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.



