कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेले पाच आरोपी जेरबंद

नांदेड : जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून गावठी पिस्टल, जिवंत काडतूस, खंजरासह एकूण 1,32,160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी रात्री 11.00 ते 28 एप्रिल 2026 पहाटे 5.00 वाजेपर्यंत नांदेड शहरात कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक अतुल भोसले (स्थानिक गुन्हे शाखा) यांनी पथकाला आवश्यक सूचना दिल्या.
दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल घोगरे व त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, कामठा बाजार ते गाडेगाव रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाखाली काही इसम संशयास्पदरीत्या फिरत असून त्यांच्या ताब्यात शस्त्रे आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकला.
छाप्यात खालील आरोपींना ताब्यात घेण्यात आले :
योगेश ऊर्फ गोटया चंदर सोनकांबळे (रा. हर्षनगर, नांदेड)
राहुल नागनाथ काळे (रा. साठे चौक, खोब्रागडे नगर, नांदेड)
राम ज्ञानेश्वर कांबळे (रा. चिखलवाडी, मुदखेड)
श्रावण रामजी जोंधळे (रा. नवीन आबादी, मुदखेड)
मनोज साहेबराव कदम (रा. मगनपुरा, नवीन मोंढा, नांदेड)
आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस, लोखंडी खंजर, गजाळी, दोरी, मिरची पावडर पाकीट व मोबाईल असा एकूण 1,32,160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्राथमिक तपासात आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना पुढील कारवाईसाठी विमानतळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे नांदेड शहरात संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



