नांदेड जिल्हा परिषदेतील 131 कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशन पद्धतीने पार पडल्या बदल्या

नांदेड,12- शासन निर्णयानुसार नवीन जनगणना अधिनियम 1948 व जनगणना नियम 1990 अंतर्गत जनगणना कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जनगणना कामाशी संबंधित जिल्हा परिषदेतील गट क व गट ड संवर्गातील कर्मचारी वगळता नांदेड जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन, कृषी व आरोग्य विभागातील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात समुपदेशन पद्धतीने पार पडल्या.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या प्रमुख उपस्थितीत बदली प्रक्रिया पार पडली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. एस. बी. खुणे, सहायक आयुक्त डॉ. प्रविणकुमार घेले, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता अशोक भोजराज, डॉ शिवशक्ती पवार, डॉ. सलमा हिराणी आदी उपस्थित होते. आज पार पडलेल्या बदली प्रक्रियेत एकूण 131 बदल्या झाल्या आहेत. यामध्ये प्रशासकीय 87 तर विनंतीने 44 बदलांचा समावेश आहे
आज सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या बदली प्रक्रियेत सर्वप्रथम पशुसंवर्धन विभागाच्या बदल्या पार पडल्या. या विभागात एकूण 18 बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये सहायक पशुधन विकास अधिकारी पदाच्या विनंतीवरुन 2 बदल्या झाल्या. पशुधन पर्यवेक्षक संवर्गात प्रशासकीय 13 तर विनंतीने 3 बदल्यांचा समावेश आहे. कृषी विभागात कृषी अधिकारी पदाच्या 2 बदल्या करण्यात आल्या. जलसंधारण विभागात बदलीपात्र कर्मचारी नसल्यामुळे एकही बदली झाली नाही.
आरोग्य विभागातील 111 कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये प्रशासकीय 72 तर विनंतीने 39 बदल्या करण्यात आल्या. आरोग्य सहाय्यक महिला संवर्गात प्रशासकीय 1 तर विनंतीने 11 अशा एकूण 12 बदल्या झाल्या. आरोग्य सहाय्यक पुरुष संवर्गात 13 बदल्या झाल्या यामध्ये प्रशासकीय 8 तर विनंतीने 5 बदलांचा समावेश आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी एकही कर्मचारी पात्र नसल्याने या संवर्गाच्या बदल्या झाल्या नाहीत.
आरोग्य सहायिका या पदासाठी एकूण 66 बदल्या झाल्या यामध्ये प्रशासकीय 56 तर विनंतीने 10 बदल्या झाल्या आहेत. आरोग्य सेवक या संवर्गात 20 बदल्या झाल्या आहेत. यामध्ये प्रशासकीय 7 तर विनंती ने 13 बदल्या झाल्या
शासन निर्णयानुसार जनगणना कार्यात नियुक्त कर्मचारी असल्यामुळे सामान्य प्रशासन विभाग, ग्रामपंचायत विभाग, वित्त विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभागातील औषध निर्माण अधिकारी व आरोग्य पर्यवेक्षक, कृषी विभागातील विस्तार अधिकारी, बांधकाम विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आदी विभागांच्या कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया राबविण्यात आल्या नाहीत.
या बदली प्रक्रिया पारदर्शक व सुसूत्र पद्धतीने समुपदेशन पद्धतीने पार पडल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करून प्रशासनाचे आभार मानले आहेत.



