उन्हाच्या तिव्रतेने वाढला उकाडा; थंडावा मिळवण्यासाठी बच्चे कंपनीचा पाण्याच्या टाकीकडे मोर्चा

लोहा प्रतिनिधी / लोहा शहरासह परिसरात दिवसेंदिवस उन्हाची तिव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. तापमानाचा पारा सातत्याने चढत असल्याने दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. वाढत्या उष्णतेमुळे लहान मुलांनाही घराबाहेर खेळणे कठीण झाले असून थंडावा मिळवण्यासाठी बच्चे कंपनीने वेगवेगळे पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे.
लोहा शहरातील काही भागांमध्ये मुलांनी गरमीपासून बचाव करण्यासाठी थेट पाण्याच्या टाक्यांमध्ये बसून उष्णतेपासून दिलासा मिळवण्याचा मार्ग स्वीकारला आहे. पाण्याच्या टाकीत बसून खेळण्याचा आनंद घेत असतानाच तीव्र उकाड्यापासून काही काळासाठी आराम मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः दुपारच्या वेळी तापमान अधिक वाढत असल्याने लहान मुले पाण्यात रममाण होताना दिसत आहेत.
दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे तसेच लहान मुलांनी सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे.
लोहा शहरात सध्या तीव्र उष्णतेमुळे जनजीवन प्रभावित झाले असून, गरमीपासून काहीसा दिलासा मिळवण्यासाठी बच्चे कंपनीचा पाण्याच्या टाकीकडे वाढता कल पाहायला मिळत आहे. – छाया : विनोद महाबळे



