आष्टी येथील बौद्ध बांधवांचे बेमुदत धरणे आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा
नांदेड प्रतिनिधी / नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मौजे आष्टी, ता. धर्माबाद येथील बौद्ध बांधवांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाला आता विविध सामाजिक व राजकीय संघटनांकडून पाठिंबा मिळू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनास जाहीर पाठिंबा दर्शविला.
मौजे आष्टी येथील बौद्ध बांधवांनी त्यांच्या विविध मागण्या शासन स्तरावर मार्गी लावण्यात याव्यात, या प्रमुख उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनकर्त्यांनी शासन प्रशासनाने त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. आंदोलनस्थळी अनेक आंदोलक ठिय्या देऊन आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे दिसून आले.
दरम्यान, या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, उत्तर जिल्हाध्यक्ष आटकोरे, तसेच लोहा तालुक्याचे जेष्ठ मार्गदर्शक बी. बी. गायसमुद्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत शासनाने तातडीने दखल घेण्याची गरज व्यक्त केली.
आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. – छाया : विनोद महाबळे



