वजिराबाद पोलिस व अन्न-औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई; नशा निर्माण करणाऱ्या गोळ्यांची अवैध विक्री उघड

नांदेड, प्रतिनिधी : वजिराबाद गुन्हे शोध पथक व अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करत नशा निर्माण करणाऱ्या Pregabalin Capsules ची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन मेडिकल चालकांवर कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 1,540 गोळ्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची अंदाजे किंमत 38 हजार 38 रुपये इतकी आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये ऑक्सीजन मेडिकल, बाफना नांदेड येथील चालक तसेच हेल्थ ओके मेडिकल, दत्त नगर रोड, सम्राट नगर, नांदेड येथील चालकाचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक Abhinash Kumar यांच्या निर्देशानुसार ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. त्याअंतर्गत शहरातील काही मेडिकल चालक हे कॉलेज युवक व गुन्हेगारांना डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशा निर्माण करणाऱ्या गोळ्यांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
यावरून वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक Parmeshwar Kadam यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली. पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून संबंधित मेडिकलवर पाठविले. त्यावेळी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय Pregalab-300 Capsules च्या 10 गोळ्या 150 रुपयांना विक्री करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. तसेच कोणतेही विक्री बिल देण्यात आले नसल्याचेही समोर आले.
त्यानंतर सहाय्यक आयुक्त (औषधे) Ashok Rathod यांच्या उपस्थितीत दोन्ही मेडिकलची तपासणी करण्यात आली. या तपासणीत Pregalab-300 Capsules च्या एकूण 1,540 गोळ्या आढळून आल्या. संबंधित मेडिकल चालकांकडे औषध खरेदीची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याने अन्न व औषध प्रशासन, श्रीनगर नांदेड यांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
दरम्यान, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशा निर्माण करणाऱ्या औषधांची विक्री करू नये, तसेच अशा प्रकारची विक्री आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.



