पेट्रोल-डिझेल दरवाढ व टंचाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन; निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नांदेड | प्रतिनिधी – पेट्रोल व डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असून, त्यातच निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अनुसूचित जाती शहर विभागाच्या वतीने पेट्रोल-डिझेल दरवाढ व टंचाईच्या निषेधार्थ आंदोलन करत निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनाद्वारे केंद्र व राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींवर तातडीने नियंत्रण आणावे, इंधन टंचाई दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात तसेच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी व वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली. वाढत्या इंधन दरांचा परिणाम वाहतूक, शेती, उद्योगधंदे तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होत असल्याने महागाईत मोठी भर पडत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी सरकारच्या धोरणांवर टीका करत सामान्य जनतेला दिलासा देण्याची मागणी केली. काँग्रेस महानगराध्यक्ष अब्दुल गफार यांनी वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्याचे सांगत तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. अनुसूचित जाती शहर विभागाचे अध्यक्ष तथा नगरसेवक सत्यपाल सावंत यांनीही इंधन दरवाढ व टंचाईमुळे शहरातील नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे सांगितले.
यावेळी ज्योती कदम, दीपसिंघ हजुरिया, अंबादास रातोळे, संजय वाघमारे, गजानन सरोदे, गोविंद पाटील, गौतम क्षीरसाठ यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. छायाचित्र : ज्ञानेश्वर सुनेगावकर



